देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे “साथ साथ”
मुंबई नगरी टीम
मुंबई : निवडणुक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर बरसणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता भाजपला साथ देण्याची चर्चा आहे.आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचे समजते सुमारे तासभराच्या बैठकीत पुढील राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले असल्याचे बोलले जाते.
भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेवून राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने शिवसेनेला लक्ष्य करीत मनसेला जवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. भाजपचे नेते आणि माजी मंत्री विनोद शेलार यांनी काही दिवसापूर्वी कृष्णकुंजवर जावून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून चर्चा केली होती. तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपासोबत जाण्याचे स्पष्ट संकेत काल दिले होते.त्यानंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून सुमारे तासभर चर्चा केली.उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसला सोबत घेवून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका मावळल्याची टीका होवू लागली.
येत्या २३ जानेवारीला मनसेचा मेळावा होणार असून, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मनसे आपल्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याने या दोन पक्षांत आघाडी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मनसेला सत्ता देण्याऐवजी मनसेला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असे आवाहन केले होते. विधानसभेत मनसेचा एकच आमदार निवडून आला आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर होणा-या मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.