संजय राऊतांचे विधान ही शिवसेनेची भूमिका आहे का ? : अशोक चव्हाण
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर मत व्यक्त करणे आवश्यक नाही.काँग्रेसची भूमिका अगोदरच स्पष्ट झालेली आहे.पण राऊत यांचे विधान ही शिवसेनेची भूमिका आहे का, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या विधानावर मत व्यक्त करणे आवश्यक नाही.काँग्रेसची भूमिका अगोदरच स्पष्ट झालेली आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करते आहे.कोणाची वैयक्तिक विधाने ही सरकारची विधाने असू शकत नाहीत.त्यामुळे हे विधान म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखा आहे.अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बाधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून) चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.खा.संजय राऊत आता स्वा.सावरकरांविषयी जे बोलत आहेत, ते सावरकर प्रेम आहे, की पश्चातबुद्धी ? असा सवाल शेलार यांनी केला आहे.जर खरंच ते प्रेम व्यक्त करीत असतील तर ही त्यांची प्रतिक्रिया योग्य आहे.अंदमानच्या त्या जेलमध्ये गेल्या शिवाय स्वा. वि.दा. सावरकर कळणार नाहीत, हे खरे आहे. त्यामुळे वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या त्यांच्या मित्र पक्षाला त्यांनी हे ताठ मानेने सांगावे. स्व. इंदिरा गांधी यांच्या विषयी केलेले विधान जसे मागे घेतले तसे सत्तेसाठी त्यांनी सावरकरांवरील प्रेम ही मागे घेऊ नये. ते चिरकाल टीकावे, एवढी अपेक्षा आहे असेही शेलार यांनी म्हटले आहे.