आयुष्यभर भाजपाची पालखी वाहणार नाही : उद्धव ठाकरे

आयुष्यभर भाजपाची पालखी वाहणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई नगरी टीम

नागपूर: शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वचन शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना दिले होते.बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल आणि वचन पूर्ण करेल.आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि यापूढेही पाळणार आहोत,असे सांगून,भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही.यापूर्वी भाजपाचे ओझे वाहत होतो आता ते खांद्यावरून उतरवले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत राज्यपालांच्या अभिभाषणवर उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली.

विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणवर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या सदस्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.सरकारवर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भारूडाच्या माध्यमातून टीका केली होती.त्याला मुख्यमंत्र्यांनी अभंगाच्या माध्यमातून उत्तर दिले.अच्छे दिन येईची ना,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येईची ना,देशातील बेकारी हटेची ना, दोन कोटी लोकांना रोजगार मिळेची ना,स्मार्ट सिटी होईची ना,नोटबंदी नंतरचे ५० दिवस संपेची ना,विदेशातील काळा पैसा भारतात येईची ना,देशातील आर्थिक मंदी जाईची ना,असे सांगून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.तर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजून यांचे स्वागत केले.शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसच्या पाठिंब्याने करणार, असे वचन बाळासाहेबांना दिला होते का ? अशी टीका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली होती.या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावत समाचार घेतला.काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे म्हणालो नव्हतो.मात्र दिलेल्या शब्दाचे कौतूक तुम्हाला कधीपासून होऊ लागले.मी बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल आणि बाळासाहेबांचे वचन पूर्ण करेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि यापुढेही पाळणार असे सुनावत भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. भाजपाचे ओझे वाहत होतो आता ते खांद्यावरून उतरवले आहे,चहापेक्षा किटली गरम असे कोणतरी सभागृहात म्हणाले. मात्र किटली पुसणारे फडके पण गरम होऊ लागले आहे असा टोला त्यांनी लगावला.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना टोला लगावताना संत तुकडोजी महाराज यांचा अंभग वाचून दाखविला.धर्म आणि राजकारण एकत्र करू नका.सरकार चालवताना किमान समान कार्यक्रम आहे.हे माझे नाही तर आमचे सरकार आहे.पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे: शांती सदा विराजे,या झोपडीत माझ्या, या अभंगाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर केलेल्या टीकाचाही समाचार घेतला. भविष्यात शिवसेना आणि आम्ही परत एकत्र येऊ.त्यामुळेच शिवसेनेवर जास्त बोलत नाही असे मुनगंटीवार आपल्या भाषणात म्हणाले होते.त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,मुनगंटीवार सुधीर,नका होऊ इतके अधीर, झालात तुम्ही बेकार,म्हणून अजब वाटते आमचे सरकार असा टोला  हाणला.राज्यातील सरकार हे तीन चाकी सरकार असल्याने किती धावणार या फडणवीस यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे तीन चाकी आहे. कारण गोरगरिबांना तीन चाकी रिक्षा परवडते.बुलेट ट्रेन परवडत नाही आणि परवडणार नाही असे मुख्यमंत्री महणाले.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सामानातून केलेल्या टीकेचा दाखला देत विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.त्याचाही समाचार मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला.सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुतीही केली होती. मात्र सोयीचे तेवढे दाखवायचे असे भाजपचे धोरण आहे असा चिमटा त्यांनी काढला.

स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरही  मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.सावरकरांनी हिंदु असेल तर त्याला दोन घास द्या,बाहेरील हिंदुना घ्या,पण त्यांना कुठे आसरा देणार असा सवाल त्यांनी केला.ज्यावेळी काश्मीरमधील ब्राम्हण निर्वासित म्हणून आले,त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना आसरा दिला, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. गोवंश हत्याबंदीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. सावरकर म्हणजे काय हे दुसऱ्यांना समजून सांगण्याऐवजी आपण समजून घेऊया.माझ्या महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता ? असा टोला त्यांनी लगावला.सावरकर कोण शिकवतय,सावरकर कळले आहेत का असा प्रश्न उपस्थित करून, एकमेकांवर चिखल फेकण्यापेक्षा सावरकर समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.बेळगावचे बांधव हिंदू नाहीत का प्रश्न केला,सीमावासिय मराठी बांधव असून,त्यांच्यावर होणा-या अन्यायासाठी केंद्राकडे मदत का मागू शकत नाही असे सांगून, बेळगाव हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आपल्याकडे आणला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यावर आपण भर देणार असून,कर्नाटक व्याप्त प्रदेशातील मराठी बांधवांवर कदापी अन्याय होऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली.शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहोत.त्याचप्रमाणे राज्याची खरी आर्थिक स्थिती देखील जनतेसमोर आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितेले.

Previous articleपवारांचा नाद करू नका,पवार कळायला १० जन्म अपुरे पडतील!
Next articleनवाब मलिक आणि संजय कुटे यांच्यात खडाजंगी