मुंबई नगरी टीम
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानप्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेतील वादग्रस्त पूर्वी भाजपात असणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली.
उपमहापौर असताना श्रीपाद छिंदमने महानगरपालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून संभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचे व्हिडीओ प्रसारीत होताच त्याच्यावर प्रखर टीका करण्यात आली होती.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येवून तडीपार करण्यात आले होते.या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होवू नये म्हणून भाजपने त्याच्यावर कारवाई करीत त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती.यानंतर झालेल्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत तो अपक्ष नगरसेवक म्हणून विजयी झाला होता.त्याने वापरलेल्या अपशब्दाबद्दल यापूर्वीच्या सभागृहाने छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता.त्यानंतर हा सरकारकडे पाठविण्यात आला असता त्यावर कारवाई करण्यात आली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आली होती. मात्र,या सुनावणीला छिंदम उपस्थित राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी घेण्यात आली.या सुनावणीलाही तो हजर राहिला नाही.त्यामुळे त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांनी माहिती सभागृहात दिली.