धक्कादायक…राज्यात एका वर्षात सापडले एवढे कुष्ठरोगी !

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्यात १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राबविलेल्या शोध मोहिमेत ६ हजार ११६ नविन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून, एप्रिल २०१९ ते डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यामध्ये १३ हजार ८३५ नागिन कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यात आल्याची माहिती विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामुळे समोर आली आहे.

राज्यात कुष्ठरोगांच्या संख्येत वाढ होत असल्याबाबतचा प्रश्न  सदस्य विकास ठाकरे यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केला होता. त्याला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील माहिती उघड झाली आहे. १३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राबविलेल्या शोध मोहिमेत ६ हजार ११६ नविन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून, एप्रिल २०१९ ते डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यामध्ये १३ हजार ८३५ नागिन कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.या सर्व रुग्णांना बहुविध औषधोपचार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती कुष्ठरोगाचे रूग्ण ?

एप्रिल,२०१९ ते डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यात कुष्ठरोगाचे सर्वाधिक नविन रुग्ण अनुक्रमे चंद्रपूर (१३६२), पालघर (१०६९), नाशिक(८७७), गडचिरोली (८७५) या चार जिल्हयात आहेत. भंडारा जिल्हयामध्ये (३९४) व गोंदिया जिल्हयामध्ये (३४७) नविन कुष्ठरुग्ण आहेत. नवी मुंबईवगळता ठाणे शहरासह कल्याण, उल्हासनगर व मीरा-भाईंदरसारख्याशहरांमध्ये सन २०१८-२०१९ च्या तुलनेमध्ये सन २०१९-२०२० डिसेंबर अखेरमध्ये नवीन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मायक्रो बॅक्टेरिअम लेप्री या जंतुची पावर वाढली असल्याचे आढळून आले नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या राज्य व जिल्हास्तरीय सभेमध्ये कार्यक्षेत्रनिहाय नियमितपणे आढावा घेतला जातो व जिल्हास्तरावरुन प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी केली जाते. त्यामुळे वर्ग चौकशी केली जात नाही. सदर शहरामध्ये स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण दाट लोकवस्ती व दीर्घ कालावधीचा अधिशयन काळ यामुळे कुष्ठरोगाचे रूग्ण आढळत आहेत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

Previous articleवादग्रस्त श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द
Next articleअबब…राज्यात आणि मुंबईत गेल्या वर्षी एवढ्या नवजात बालकांचा मृत्यु