मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत,औरंगजेबाचे नाही.त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे झालेच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला.यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही मागणी केली.
पाटील म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून,त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही.औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता.त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.शेतकरी कर्जमाफीवरुनही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली.ते म्हणाले की, नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची स्थिती आहे.कर्जमाफीच्या नुसत्या घोषणा असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही. सरकारने ३५ लाख जणांची कार्जमाफी करण्याची घोषणा केली, आणि केवळ १५ हजार जणांचीच यादी जाहीर केली. या गतीने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कधी? असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, कर्जमाफीसाठी सरकार जर आचारसंहितेचं कारण देत असेल, तर कर्जमाफीसह, थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय ही थांबवावा लागेल असेही ते यावेळी म्हणाले.