शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन २०२०-२१चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा असल्याचे म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे.धनंजय मुंडे यांचे स्वप्न असलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असून ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना साठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केले आहे. मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास भरघोस निधी देण्यात आला असून जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे.

२०२०-२१ चा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे स्वागत करत हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा त्यांना ताकद देणारा असून, शहरी दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य देणारा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा, ग्रामपंचायत बळकट करणारा, कोकणात मच्छिमार, फलबागायतदारांना नवीन संधी निर्माण करणारा, सेवा व उद्योग क्षेत्राला उभारी देणारा, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यासह इतर सुविधा देणारा, राज्याला शिस्त लावत अर्थकारणाला चालना देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला ९६६८ कोटी एवढी भरगच्च आर्थिक तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भाजपा सरकार मागासवर्गीयांना न्याय देऊ शकली नाही, महाविकास आघाडी सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून माझ्यासमोर सर्व योजना व लोकाभिमुख उपक्रमावर हा निधी खर्च करण्याचे आव्हान असून, या आव्हानास सामोरे जाण्यासाठी आम्ही काम सुरू केलं असल्याचेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले. “चालू वर्षात रमाई योजनेमधील एकही घरकुलाचे बांधकाम झालेले नाही, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर ५० टक्के खर्च ही मागच्या सरकारने केला नव्हता, मागील वर्षीच्या नऊ हजार २०८ कोटी रुपयांपैकी केवळ २८८३ कोटी रुपये निधी खर्च झाला होता; असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

ऊसतोड मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना असलेले लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची घोषणाही यावेळी अजित पवारांनी केली. तसेच याअंतर्गत ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचेही घोषित केले आहे. हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे नुकतेच वर्ग करण्यात आले आहे, त्यायोगे ऊसतोड मजुरांच्या जीवनात स्थैर्य, सुरक्षेसोबत आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही  मुंडे यांनी म्हटले आहे.

Previous articleअर्थसंकल्प नव्हे, हे तर जाहीर सभेतील भाषण : देवेंद्र फडणवीस
Next articleविकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्पः अशोक चव्हाण