मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकाराने महाराष्ट्रात संचारबंदी जारी करून चांगले पाऊल उचलले आहे,त्याबद्दल सरकारचे मनापासू अभिनंदन आहे,पण या काळात टॅक्सीचालक, रिक्षाचालक व फेरीवाले तसेच दूधविक्रेते, दूध वितरक, वृत्तपत्र विक्रेत, घरोघरी वृत्तपत्र टाकणारे, घरेलू कामगार, नाका कामगार, कुरिअर पोहचविणारे डिलिव्हरी बॉय आदी दैनंदिन उपजिविका करणा-या असंघटीत कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी वर्गालाही राज्य सरकारने दिलासा द्यावा व ३१ मार्च पर्यंत या वर्गाला दर दिवशी काही ठराविक रक्कम जाहीर करावी अथवा त्यांच्यासाठी सरकारी योजनेतून रेशन उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकल बंद करतानाच संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, गर्दी टाळण्यात यावी अशा योग्य उपाययोजना सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. सरकारी व खाजगी कर्मचा-यांना वर्क फॉर्म होमची सवलत देण्यात आली आहे. तसेत सरकारी, खाजगी, औद्योगिक आदी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या या काळातील वेतन कापू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पण या काळात दैनंदिन उपजिविका असणारे रिक्षा, टॅक्सी व फेरीवाल्यांच्या बाबत निश्चित धोरण अद्यापही घोषित झालेले दिसत नाही, त्यामुळे या वर्गासाठी सरकराने दैनंदिन उपजिविकेसाठी निश्चित उपाययोजन करावी असे आवाहन दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.