रुग्णांना सेवा नाकारल्यास खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयाचा परवाना रद्द करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे,शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात असतानाच काही डॉक्टर्स व खाजगी रुग्णालय त्यांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास  संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

राज्यावर आणि देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज असून,खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत, पण काही डॉक्टर्स व खाजगी रुग्णालय त्यांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत,खरंतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे,अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत,पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत.या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.

दरम्यान खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास  संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

Previous articleलॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे:  जयंत पाटील यांची मोदींवर टीका
Next articleमुंबई आणि ठाण्यात ६ रूग्ण आढळले ;कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११६ वरून १२२ वर