स्वत: गाडी चालवत “हे” मंत्री घेतायेत जिल्ह्याचा आढावा

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग: राज्यात कोरोना विषाणूंच्या प्रातुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.या परिस्थितीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत स्वत: गाडी चालवत रत्नागिरी बरोबरच पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.आज त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करीत कर्तव्यांवर असणा-या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन सर्वच पातळीवर खबरदारी घेताना दिसत आहे.कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत.या मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे परिस्थिती हाताळण्यासाठी  दिवसरात्र झटत  आहेत.रत्नागिरीचे आमदार असल्याने त्यांना रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घेतानाच पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही विशेष लक्ष द्यावे लागत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत सर्व लवाजमा बाजूला सारून कोणसलीही सुरक्षा न घेता सामाजिक अंतर राखत मंत्री सामंत हे स्वत: गाडी चालवत प्रत्येक ठिकाणची पाहणी करीत आहेत.दौ-यात ठिकठिकाणी थांबून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत.संपूर्ण प्रवासात ते चालक न घेता स्वत:च वाहन चालवत नाकाबंदी करण्यात आलेल्या चेक पोस्टवर  भेट देत आहेत,भेटी वेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधून या कठीण प्रसंगामध्ये चोवीस तास अविरतपणे सेवा देत असलेल्या कर्मचा-यांचे कौतुक करीत त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करताना  दिसत आहेत.

आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला.यावेळी त्यांनी राजापूर तालुक्यातील हातीवले येथील चोकपोस्टवर थांबून आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेची पाहणी केली. कर्मचा-यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करीत त्यांचे मनोधैर्य वाढविले.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये सध्या एकच रूग्ण आढळला असला तरी या विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून प्रशासन विशेष खबरदारी घेताना दिसत आहे.

Previous articleराज्यात कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सण,उत्सव,मेळावे होणार नाहीत 
Next articleमुख्यमंत्री निधीला योगदान देत “या पोलीसाने” घडवले माणूसकीचे दर्शन