वसईतील तब्लिगीला परवानगी नाकारल्याने संभाव्य धोका टळला !  

मुंबई नगरी टीम

मुंबई : दिल्ली येथील तब्लिगी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी भाविक देशभर आपआपल्या गावी परतल्याने आणि त्यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने संपूर्ण देशात सद्या भीतीचे वातावरण आहे. दिल्ली सारखाच तब्लिगी हा धार्मिक कार्यक्रम वसई येथे होणार होता,गृह विभागाने वेळीच सतर्कता बाळगून परवानगी नाकारल्याने कोरोनाचा संभाव्य प्रसार आपण थांबवू शकलो असे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम वसई येथील दिवानमान या गावालगच्या परिसरात तब्लिगी इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमास परवानगी मिळावी म्हणून शमीम एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटीने गृह विभागास रितसर पत्र देऊन परवानगी मागितली होती.१४ व १५ मार्च रोजी वसई येथे हा धार्मिक कार्यक्रम होणार होता. यामध्ये कुरआन पठन, प्रवचन व नमाज आदी कार्यक्रम होणे अपेक्षित होते. या कार्यक्रमास साधारणपणे ५० हजार भाविक जमणार असल्याचे संस्थेच्यावतीने कळविण्यात आले होते. सोसायटीच्या विनंतीवरून पोलिस यंत्रणेने ५ फेब्रुवारीच्या पत्रान्वये कार्यक्रमास परवानगी देत असल्याचे सोसायटीला कळविले होते.

दरम्यान देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. अनेकांना दरम्यान क्वारंटाईन करण्यात आले. काही संशयितांवर उपचार सुरू करण्यात आले होते. अशा परिस्थिती ५० हजार नागरीक एकत्र येणे कोरोनाच्या विषाणू नियंत्रणाच्या दृष्टीने धोकादायक होते. अशा धार्मिक कार्यक्रमातील भाविकांच्या जमावापासून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने गृह विभागाने वेळीच सतर्कता बाळगून कार्यक्रमास दिलेल्या परवानगीचा फेरविचार केला. त्यानुसार दिनांक ६ मार्च २०२० रोजी या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली. तसेच तब्लीगीच्या आयोजकांना हा कार्यक्रम होऊ नये याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने वेळीच सतर्कता बाळगल्याने दिल्लीसारखी उद्भवू पाहणारी परिस्थिती आपण थांबवू शकलो, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

दिल्ली येथील कार्यक्रमाने संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. येथील भाविक आपआपल्या गावी निघून गेल्याने या भाविकांसह स्थानिक पातळीवर काहिंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेकांना क्वारंटाईन  करण्यात आले आहे. राज्यात गृह विभागाने तत्परता दाखवून संभाव्य निर्माण होऊ पाहणारी परिस्थिती टाळली, तशीच दिल्ली येथेही वेळीच सतर्कता बाळगून परिस्थिती टाळता आली असती, असे देशमुख  यांनी सांगितले.

Previous articleपोलीस,आरोग्य कर्मचा-यांसाठी झटतोय “हा तरूण आमदार”
Next article..तर पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान