सव्वा तीन लाख पीपीई कीटस्,मास्क,व्हेटीलेटर्सची केंद्राकडे मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, नऊ लाख एन ९५ मास्क आणि  ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या साहित्याची मागणी केंद्र शासनाकडे केली असली तर राज्यात या साहित्याची खरेदी करण्याकरिता आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देशही विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य राज्यांनी त्यांच्या स्तरावर खरेदी करू नये केंद्र शासनाकडून त्याचा पुरवठा करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र केंद्र शासनाकडून राज्यांना पाठविण्यात आले आहे. सध्या राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ३५ हजार पीपीई कीटस्, तीन लाखाच्या आसपास एन ९५ मास्क, २० लाख ट्रीपल लेअर मास्क, १३०० व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र शासनाकडे यासर्व साहित्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. राज्यात याचा तुटवडा जाणवू नये यासाठी या साहित्याची खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत राज्याच्या आरोग्य सचिवांना निर्देश दिल्याचे आोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleकोरोना बाधितांची झपाट्याने वाढ; रुग्णांची संख्या ८६८ वर पोहचली
Next articleधर्मगुरूंचे तबलिगींना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन