खुशखबर : नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करणार !  

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यावर असलेल्या कोरोना संकटामुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर तर नववी आणि अकरावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.देशातील २१ दिवसांचा असणारा लॅाकडाऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नववी आणि अकरावीची परीक्षा न घेता वर्षभरातील प्रगती आणि मुल्यमापन करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने राज्य सरकारला सादर केल्याचे समजते.त्यानुसार नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

देशात आणि राज्यात कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मार्च महिन्यात सुरू असलेला इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि नववी आणि अकरावीची परीक्षा १४ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॅाकडाऊन येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याने दहावी,नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच, आता या विद्यार्थ्यांनी दिलासा देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दहावीच्या भूगोलाचा पेपर न घेता मुल्यांकन करून विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे,तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येवून त्यांची वर्षभरातील प्रगती पाहून आणि मुल्यांकन करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे.याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावामध्ये नववी आणि अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थ्यांचे महाविद्यालय आणि  शाळास्तरावर त्या त्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन आणि वर्षभरातील प्रगती लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत आणि त्यांचा निकाल जाहीर केला जावा अशी शिफारस करण्यात आल्याचे समजते.शाळा-महाविद्यालयांमध्ये नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम शिकवण्याचे तास हे पूर्ण झाले असून,केवळ परीक्षा घेणे बाकी होत. तर काही ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा घेणे सुरू होते.सध्या राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन मुळे  या परिस्थित विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षेसाठी बोलावने योग्य ठरणार नाही. त्यामुळे या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत त्या रद्द करून त्यासाठी सरसकट मूल्यमापन पद्धत अवलंबावी आणि विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत, अशी शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.राज्यात सध्या नववीच्या वर्गात सुमारे १७ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Previous articleराज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७६१ वर पोहचली
Next articleधनंजय मुंडेंचा शेतक-यांना दिलासा ;३ लाख ५० हजारांचा भाजीपाला घेतला विकत