मुंबई नगरी टीम
मुंबई : वांद्रयाची घटना म्हणजे राज्य सरकार व गृहखात्याचे सपशेल अपयश आहे. राज्य सरकारचे गृह खाते, गुप्तचर खाते व गृहमंत्री नक्की काय करीत आहेत असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज उपस्थित केला आहे.
मोठ्या संख्येने मजूरवर्ग बाहेर आला आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला हा प्रसंग निश्चितपणे गृह खात्याचे अपशय आहे. राज्य सरकारला अश्या परिस्थितीवर अपयश आल्याचे दिसून येत आहे. स्थलांतरित मजूरांना योग्य मदत मिळत नाही. त्यांच्यापर्यंत अन्नधान्याची व्यवस्था होत नाही, हे या घटनेतून दिसून येत आहे.कोरोनाचे महाराष्ट्रावरील सध्याचे संकट पाहता या लॉकडाऊनचा कालावधी पुढे जाईल हे नक्कीच राज्य सरकारला माहित होते. त्यामुळे या परिस्थितीत विविध ठिकाणी अडकलेला कामगार, स्थलांतरित होणारा मजूर, नाका कामगार आदी घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अन्नधान्याची व निवाराची योग्य व्यवस्था करणे राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी होती. पण राज्य सरकारने ही जबाबदारी योग्य पध्दतीने पार पडलेली दिसत नाही, अन्यथा वांद्र्यासारखी घटना घडली नसती. त्यामुळे आता तरी अश्या गंभीर घटनांची नोंद घेऊन जबाबदारीपूर्वक परिस्थिती हाताळावी असे स्पष्ट मत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.