मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असतानाच आता राजकीय आरोपप्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. कोरोनाचा मुकाबला धैर्याने करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातीस जनता कौतुक करीत असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता उत्तर दिले आहे.या अडचणीच्या काळात ज्यांच्या मनासारखे होत आहे ते कौतुक करीत आहेत तर काहींच्या मनासारखे होत नसल्याने ते रागावले आहेत अशा शेलक्या शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. शत्रू समोर असेल तर एक घाव दोन तुकडे केले असते पण हा शत्रू दिसत नाही आहे.आपण जिद्दीने लढतो आहोत. उद्या हे युद्ध सुरु होऊन ६ आठवडे झाले आहेत.काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत आपण ६६ हजार ८०० टेस्ट केल्या त्यापैकी किमान ९५ टक्के निगेटिव्ह ३६०० पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील ७५ टक्के अति सौम्य लक्षणे असलेले आहेत. ५२ रुग्ण गंभीर असून गंभीर रुग्णांना वाचवणे याकडे लक्ष केंद्रित केले आहे.बऱ्याच वेळा हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी येतात. काही बाबतीत तर चाचणीचा अहवाल येण्याच्या आतच त्या रुग्णाचे निधन झाले आहे असे लक्षात येते.कोणतेही लक्षण लपवू नका.न घाबरता फिव्हर क्लिनिकमध्ये लगेच जा. लवकर या, लवकर इलाज होईल.गंभीर झालेले रुग्ण देखील बरे झाले आहेत. पण वेळेत आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काल खासगी क्लिनिक आणि डॉक्टर्सशी बोललो.ते देखील लढ्यासाठी तयार आहेत. हे सर्व जण आज उद्यापासून कोरोना नसलेल्या रुग्णांच्या तपासणी करतील.डॉक्टर्सना आवाहन आहे की घाबरू नका. सरकार जिथे शक्य आहे ती सर्व वैद्यकीय उपकरणे आपणास देईल.गोर गरीबांपर्यंत ८० ते ९० टक्के धान्य पोहचवले आहे. केशरी शिधापत्रिकावाल्यांना सुद्धा आता मिळण्यास सुरुवात होईल.केंद्र सरकार अन्न धान्य पुरवठ्यात मदत करते आहे.पण काही जण म्हणत आहेत की केंद्र तर मोफत धान्य देते आहे. केंद्र सरकार केवळ अन्न सुरक्षा योजनेतील लोकांसाठी मोफत तांदूळ देते आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.केंद्राकडे गहू, डाळीची मागणी केली आहे. लवकरच तो पुरवठा केंद्राकडून केला जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांत घट होते आहे. पण भ्रमात राहायचे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्यापासून आपल्याला हे रुतलेले अर्थचक्र फिरवायचे आहे.काही जिल्ह्यात कोरोनाचे शून्य रुग्ण आहेत, काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज , ग्रीन असे झोंन केले आहेत. काही निवडक ठिकाणी माफक स्वरूपात उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असला, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करीत असाल तर मान्यता मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.शेती आणि कृषी,जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत अडथळा येणार नाही. २० एप्रिलनंतर काही प्रमाणात शिथिलता आणत आणण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत. जिल्हा ओलांडून यायला परवानगी दिलेली नाही. किमान ३ मे पर्यंत हे बंधन असणार असल्याचे सांगतानाच अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू,माल यांची वाहतूक करायची आहे मात्र व्हायरस ची वाहतूक करायची नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्तमानपत्रांवर वितरणावर बंदी नाही, स्टॉल्सला परवानगी आहे. मात्र घरोघरी वितरण नको. माझी भीती अनाठायी असेलही.तुम्ही मी चांगले काम करतो म्हणून कौतुक करीत आहात पण काहींनी टीकाही केली तरी महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा ही स्वीकारेल. ही आरोग्य आणीबाणी आहे आणि त्यात मला धोका पत्करायचा नाही.मी काही संपादक आणि मालक यांच्याशीही बोलून त्यांना समजावून संगितले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांनी खूप आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा.आणि मास्क वापरा.एन्टी कोरोना पोलीस सारखे चांगले उपक्रम राबविले जात आहेत. आहेत. लहान लहान मुलं वाढदिवसाला साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देताहेत. मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. मी त्यांना खात्री देतो की आमची पिढी हे सर्व सांभाळायला खंबीर आहे.ज्यांना सीएसआर म्हणून या निधीत द्यायचे आहे त्यांच्यासाठी वेगळे खाते सुरु केले आहे.या लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवरील अत्याचार होता कामा नये, असे होत असेल तर महिलांनी १०० नंबर तक्रार करा.याशिवाय मानसिकरीत्या अस्वस्थता वाढली असेल आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या १८००१२०८२००५० क्रमांकावर तसेच आदिवासी विकास विभाग , प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता यांच्या १८००१०२४०४० क्रमांकावर जरूर संपर्क साधा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.