खूशखबर : आता मुंबई,पुणे वगळता सर्वत्र वर्तमानपत्र घरपोच  मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई,पुणे आणि करोग्रस्त कंटेनमेंट झोन वगळून राज्यातील सर्व भागात वर्तमानपत्रे घरपोच वितरण करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.त्यामुळे तब्बल महिन्याभरानंतर  वाचकांच्या घरापर्यंत वर्तमानपत्रे पोहचणार आहे.राज्य सरकारने वृत्तपत्र वितरणास परवानगी दिली होती मात्र घरपोच वितरण करण्यास मनाई केली होती.

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू करताना केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सर्शत परवानगी दिली होती. राज्य सरकारने यातून वृत्तपत्रे घरपोच वितरणास परवानगी नाकारली होती.या निर्णयानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विविध वर्तमानपत्रांच्या संपादकांशी चर्चा केली. त्यावेळी या संपादकांनी वर्तमानपत्रे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.यासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने आपला निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. राज्यभरात  वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील. मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

The good news: Newspapers will now be available everywhere except Mumbai and Pune

Previous articleमुंबई- पुण्यातील सवलती रद्द ; फरसाण,मिठाईच्या दुकानासह बांधकामे बंद राहणार
Next articleपरराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा : मुख्यमंत्री