मुंबई नगरी टीम
सांगली : ज्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोरगरिबांना गेल्या १५-२० दिवसापासून ‘माणुसकीची थाळी’ भरविली जात आहे ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील ‘कम्युनिटी किचनना आज भेटी दिल्या.यावेळी त्यांनी जेवण कसे आहे ? पोटभर मिळते का? असा गरजूंशी संवाद साधत काही केंद्रावर त्यांनी ‘वाढप्या’चीही भूमिका वठविली.
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५-२० दिवसापासून शहराच्या वेगवेगळ्या नऊ भागात ‘कम्युनिटी किचन’ सुरू करून गरजूंना ‘माणुसकीची थाळी’ जेवू घातली जात आहे.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे असंख्य नागरिक व परराज्यातील मजुरांचे हाल सुरू झाल्याने ही किचन सुविधा सुरू केली आहे. पाटील यांनी आज आंबेडकर नगर,मंत्री कॉलनी, राजेबागेश्वर,मार्केट यार्ड,भाजी मंडई, घरकुल आदी भागातील ‘कम्युनिटी किचन’ ला भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,नगरसेवक विश्वनाथ डांगे,जिल्हा सरचिटणीस बाळासो पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जयंत पाटील पाटील यांनी काही नागरिकांशी संवाद साधत जेवणाच्या दर्जा, प्रमाणाबद्दल त्यांच्याकडे विचारणाही केली.