भाजपच्या “या” माजी महिला आमदारांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपात असणारी नाराजी उफाळून आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या नाराजी व्यक्त केल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी  आणि विधानसभा निवडणूकीत कोथरूडमधून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे.या निवडणूकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे,पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या चौघांना डावलण्यात येवून नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,रणजीतसिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यामुळे भाजपातील नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे.तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.आईंना, ताईंना फोन करून दु:ख व्यक्त करताय ठिक आहे.पण वाघांनो,असं रडताय काय ? मी आहे ना, “तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही”बस साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही,कुणाकुणाला उत्तर देवू ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही.भाजपच्या त्या चार उमेदवारांना आशिर्वाद ! अशा आशयाचे ट्विट करीत मुंडे यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली आहे.

विधानसभा निवडणूकीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उनेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे  कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता.आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करतानाच याचे दु: ख झाल्याचे त्यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले होते. त्यांची नाराजी दुर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द त्यावेळी देण्यात आल्याचे समजते.मात्र पक्ष विरोधी भूमिका न घेणा-या कुलकर्णी यांनाही डावलण्यात आल्याने त्यांच्या मनातील खदखद अखेर बाहेर आली आहे.त्यांनी एक ट्विट करीत आपली नाराजी व्यक्त केली आहे.माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या ट्विट मध्ये “ आज फिर दिल ने एक तमन्ना की…आज फिर दिल को  हमने समजाया….अशी शेरोशायरी करीत आपल्या नाराजी व्यक्त केली आहे.कुलकर्णी यांनी हे ट्विट करताना भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा आधार घेतला आहे. त्यामध्ये कमळाची एक पाकळी गळून पडल्याचे दर्शविले असल्याने कुलकर्णी वेगळा कोणाता निर्णय घेणार का या चर्चेला सुरूवात झाली आहे.

Previous articleशिवरायांच्या लढवय्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही
Next articleविधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार;काँग्रेसकडून एकच उमेदवार