विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार;काँग्रेसकडून एकच उमेदवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.काँग्रेसकडून आज एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.माजी मंत्री  नसीम खान आणि सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा असतानाच काँग्रेसने जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे.त्यांच्या नावाची घोषणा  मुकूल वासनिक यांनी केली आहे.काँग्रेसने या निवडणूकीत एकच उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत असून,भाजपने नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,रणजीतसिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.संख्याबळानुसार भाजपकडून चार उमेदवार देवून ही निवडणूक बिनविरोध करायची की मतदान घ्यायचे याचा चेंडू महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कोर्टात टोलावला होता.शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गो-हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.राज्यसभा निवडणूकीत राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला दोन जागा घेतल्याने या निवडणूकीत एक जागा लढवावी असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. मात्र काँग्रेसने या निवडणूकीत एकच उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी मंत्री  नसीम खान आणि सचिन सावंत यांचा पत्ता कट झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही सोमवारपर्यंत असल्याने महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची  असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू होते.काँग्रेसने केवळ एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या विधानसभेत असणारे  पक्षीय बलाबल

भाजप – १०५,शिवसेना -५६,राष्ट्रवादी काँग्रेस -५४,काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३,समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

Previous articleभाजपच्या “या” माजी महिला आमदारांनी व्यक्त केली नाराजी
Next articleसाधूंच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत करण्याची  प्रविण दरेकर यांची मागणी