मुंबई नगरी टीम
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपामध्ये सुरू असलेली नाराजी वाढतानाच दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात दररोज शाब्दिक युद्ध सुरू असतानाच आता माजी मंत्री राम शिंदे यांची त्यामध्ये भर पडली आहे.शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करीत नाराजी व्यक्त करीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील टोला लगावला आहे.
विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती मात्र या नेत्यांना डावलून रणजीतसिंह मोहिते पाटील,गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप अंतर्गत असणारी नाराजी उफाळून आली आहे.माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी फेसबुकच्या माध्यमातुन व्यक्त केली आहे. त्यानंतर खडसे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असतानाच आता माजी मंत्री राम शिंदे यांनी या मध्ये उडी घेतली आहे.
शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फेसबुक पोस्टचा आधार घेत पाटील यांना टोला लगावला आहे.पंकजा मुंडे यांच्यामुळे लातूरचे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली, पण त्यांच्यासहित इतरांना मिळाली नाही अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘विधानपरिषदेसाठी नेते, इच्छूक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील,’ असे म्हटले होते.त्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास ( त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली ) केला. जो मला आणि इतरांना जमला नाही,” असे शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.