माझ्या मुलीला जबरदस्तीने विधानसभेचे तिकीट का दिलं ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे.खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारण्यात आली याची यादी पाटील यांनी एका मुलाखतीत दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत खडसे यांच्या मुलीला उमेदवारी  देण्यात आली होती असे त्यांनी स्पष्ट केले होते.त्यानंतर आता यावरून खडसे यांनी पाटील यांना प्रश्न विचारले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर खडसे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.खडसे यांचे आरोप खोडून काढताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अशी जाहीर नाराजी व्यक्त केल्याबद्दल खडसे यांच्यावर प्रहार करीत त्यांना आजपर्यंत पक्षाने दिलेल्या संधीची यादी वाचून दाखवली होती.खडसे यांच्या  आरोपांना उत्तर देताना पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत खडसे यांच्या मुलीला उमेदवारी  दिल्याने पुन्हा विधान परिषदेत संधी दिली जात नाही,हा पक्षाचा नियम आहे, असे सांगतानाच पंकजा मुंडे आणि खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना विधानसभेत उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले होते.  पाटील यांच्या या भूमिकेवर खडसे यांनी उत्तर देत पुन्हा एकदा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांच्या विरोधात भाजपने गोपीतचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती.मग पडळकराना विधान परिषदेसाठी संधी का दिली ? का ते अपवाद ठरले ? असा सवाल खडसे यांनी उपस्थित करीत,चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्यासाठी हे कारण  आहे अशा शब्दात निशाणा साधला आहे.पाटील म्हणतात  लोकसभा निवडणुकीत सुनेला उमेदवारी  दिली.विधानसभा निवडणुकीत मुलीला उमेदवारी दिली.पण आम्ही कुठे मुलीसाठी उमेदवारीची मागणी केली होती ? विधानसभेसाठी मी माझ्यासाठी उमेदवारी मागितली होती.मला उमेदवारी नाकारण्यात आल्यावर ती ढसाढसा रडली होती.केवळ जाणूनबुजून नाथाभाऊंसारखा स्पर्धक  तयार व्हायला नको म्हणून मला उमेदवारी नाकारण्यात आली. आणि मला उमेदवारी नको म्हणून मुलीला जबरदस्तीने उमेदवारी देण्यात आली.असे स्पष्ट करीत खडसे यांनी  पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

Previous articleखडसे नंतर आता राम शिंदेंचा चंद्रकांत पाटलांना टोला !
Next articleराज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवणार ?