अजितदादांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल !

मुंबई नगरी टीम

बारामती : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक मिटिंगला जाताना खबरदारी घेताच स्वत: कार चालवताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासून सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे.मंत्रालय असो की मंत्र्यांची कार्यालये याला अपवाद नाहीत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री निवासस्थानाजवळ चहावाला कोरोना बाधीत आढळल्यानंतर या ठिकाणी मातोश्रीवर तैनात असलेल्या पोलीसांना खबरदारी म्हणून अन्यत्र हलविण्यात आले.मुख्यमंत्री ठाकरे हे मिटिंगसाठी जाताना स्वत: कार चालवताना दिसत आहे.त्यावेळी त्यांच्या कार मध्ये अंगरक्षक अथवा त्यांचे पीए वगैरे नसतात.तसाच कित्ता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गिरवताना दिसत आहेत.उपमुख्यमंत्री पवार हे आज त्यांच्या बारामती दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वत: कार चालवून शहरातील विकास कामांची पाहणी केली.सध्याच्या कोरोनाच्या संकटात पवार यांनी राबविलेल्या बारामती पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यात आहे.

आज अजित पवार हे बारामती शहराच्या दौऱ्यावर असताना स्वतः त्यांनी कारचा ताबा घेतला.शहरातील विकासकामांची पाहणी करताना पवार यांनी त्यांची टोयाटोच्या लँड क्रुझर गाडी चालवली.यावेळी अजितदादांनी आपल्या गाडीत कुणालाही बसण्याची संधी दिली नाही.या पाहणी दौ-यात  अजितदादा  नियमांचे काटेकोरपणे  पालन करत होते. पाहणी करताना शहरात चुकीच्या मार्गाने दुचाकी चालवणाऱ्यांना देखील ते खडसावताना दिसले. आजच्या दौ-यात त्यांनी  कोणताही बंदोबस्त घेतला नव्हता. त्यामुळे शहराच्या विविध चौकात अजितदादा गाडीतून उतरताच  बारामतीकरांना धक्काच बसला.

Previous articleभाजपाने आता हाजमोल्याच्या गोळ्या मोफत वाटाव्यात !  काँग्रेसची टीका
Next articleअबब…. राज्यात ४ लाख ९७ हजार व्यक्ती क्वारंटाईन