मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयातील एक धक्कादायक बाब समोर आली असून, एक ७० वर्षीय कोरोनाचा रुग्ण हरवला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. व्हेंटिलेटवर असलेला हा रुग्ण हरविणे गंभीर बाब असून त्याला जबाबदार कोण,असा सवाल सोमैया यांनी केला.
याबाबत सोमैया म्हणाले की, लालबाग जिजामातानगर येथे राहणारे एक ७० वर्षांचे रुग्ण १४ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले. १८ मे रोजी अचानक तब्येत खालवल्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात येवून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १९ मे रोजी सकाळी नातेवाईकांना सांगण्यात आले की, आपला पेशंट वॉर्डमधून हरवला आहे. यानंतर २१ मे रोजी दोन दिवसांनी एक मृतदेह दाखवत तो त्या रुग्णाचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र तो त्यांचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. १० दिवस झाले, आजपर्यंत त्या रुग्णाचा तपास सुरु आहे,ते कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही.एकीकडे कोरोनाबाधितांना उपचार कसे मिळणार याची चिंता असतानाच दुसरीकडे आता रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्याला जबाबदार कोण, याचे उत्तर रुग्णालय प्रशासनाला मात्र अद्याप सापडलेले नाही.रुग्ण कसा काय हरवला ? व्हेटिलेटरवर असलेला रुग्ण पळून तर जाऊ शकत नाही, मग याला जबाबदार कोण असा सवाल भाजपचे उपाध्यक्ष सोमैया यांनी केला आहे.