मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यावर कोरोनाचे सावट कायम असतानाच,राज्याच्या शिक्षण विभागाने येत्या १५ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा घाट घातला आहे. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती विचारात न घेताच, ऑनलाईन शाळांच्या `महंमद तुघलकी’ निर्णयाने शिक्षणाचा बोऱ्या वाजण्याचीच भीती आहे असल्याची टीका भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
शिक्षण विभागाने येत्या १५ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी टीका केली आहे.राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात न घेताच ऑनलाईन शाळांच्या `महंमद तुघलकी’ निर्णयाने शिक्षणाचा बोऱ्या वाजण्याचीच भीती असल्याचे आ.डावखरे यांनी म्हटले आहे.एकीकडे सागरी किनारा, सह्याद्रीच्या रांगा, रस्ते वा वीज नसलेला दुर्गम भाग आणि कोविडबरोबरच मुसळधार पावसाच्या सावटात ऑनलाईन शिक्षण राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचेल का याबाबत शंकाच आहे. राज्यात १ लाख ६ हजार २३७ शाळांपैकी साडेसहा हजारांहून अधिक शाळांमध्ये वीज पोचलेलीच नाही. जिल्हा परिषदेच्या ४२ हजार शाळा व पाच हजार ६०० माध्यमिक शाळांमध्ये अद्याप संगणक नाहीत.या ठिकाणी ऑनलाईनवरून धडे कसे देणार,हा प्रश्न अद्याप नियोजनकर्त्यांना पडलेला नाही, हे राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे दुर्देव आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.