मुंबई नगरी टीम
श्रीवर्धन : निसर्ग चक्रिवादळाच्या तडाख्यानंतर सरकारने तुटपुंजी मदत जाहिर करुन कोकणाला सापत्नपणाची वागणूक दिली आहे. आज पाच-सहा दिवसानंतरही येथील जनतेला एक पैसा मदत मिळाला नाही. त्यामुळे सरकारची प्रत्यक्ष मदत पोहचण्यापूर्वी चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्यांना तातडीने किमान १० ते १५ हजार रुपयांची तात्कालिक मदत रोखीमध्ये सरकारने देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. सरकारने कोकणवासीयांची थट्टा करु नये. जर सरकारने येत्या दोन दिवसात कोकणवासियांना तात्कालिक आर्थिक मदत दिली नाही तर आम्ही प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ असा जोरदार इशाराही दरेकर यांनी दिला.
निर्सग चक्रिवादळाचा मोठा फटका रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असून आज विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी माणगाव, श्रीवर्धन येथे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी म्हसळा, मोरबा, तळा, आदी भागतील परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी आमदार पराग अळवणी, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. महेश मोहिते, , यांच्यासह भाजप माणगाव तालुका अध्यक्ष संजय(अप्पा) ढवळे, तालुका सरचिटणीस योगेश सुळे, शहर अध्यक्ष राजु मुंडे, भाजप म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, म्हसळा तालुका सरचिटणीस महेश पाटील, म्हसळा शहर अध्यक्ष मंगेश मुंडे, भाजप श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, श्रीवर्धन तालुका सरचिटणीस, गजानन निंबरे, श्रीवर्धन शहर अध्यक्ष शैलेश खापणकर, भाजप तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे आदी उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी श्रीवर्धन प्रांत-तहसिलदार कार्यालयात पोलिस, कृषी, वैद्यकीय, विद्युत वितरण, ग्रामविकास अधिका-यांसमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर यांनी सांगितले की, कोकणातील नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य शासनाने पडझड झालेल्या घरांसाठी पहिल्या टप्प्यात ६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ५ हजार देण्याचे जाहीर केले. पण ही मदत तुटपुंजी असल्याने अंशतः पडझड झालेल्या घरांना प्रत्येकी २५ हजार, ३५ ते ४० टक्के पडझड झालेल्या प्रत्येकी घरांना १ लाख आणि पूर्णतः उध्वस्त झालेल्या प्रत्येकी घरांना ३ लाख रुपये देण्यात यावे, कारण पंतप्रधान आवास योजने अंतर्गत उध्वस्त झालेल्या घरांना ३ लाखापर्यंत मदतीची तरतूद असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरेकर म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणावर बागायतदार उध्वस्त झाल्यामुळे त्यांचे हाल झाले आहेत. कोकणाच्या बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने आंबा-काजू या झाडांची खुंटी कलम करण्यात यावी. बागांचे नुकसान झाल्यामुळे ही झाडे बागेत कोसळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे एक झाड बाहेर काढण्यासाठी किमान ५०० रुपये खर्च आहे. त्यामुळे पडझड झालेली झाडे वन खात्याच्या मदतीने साफ करुन देण्यात यावीत. चक्रिवादळानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदा मुंबईतून बाहेर पडून कुठल्यातरी जिल्ह्यात आले, ही समाधानाची बाब आहे. रायगडमध्ये माझ्या दौ-यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा केला व रायगडला तुटपुंजी मदत जाहिर केली. आम्ही काल रत्नागिरीचा दौरा केला त्यानंतर शरद पवार सुध्दा तिकडे पोहचणार आहेत. मुख्यमंत्री व पवार यांनी वेगवेगळे दौरे केले. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काल दौऱ्यावर आले. मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री अनिल परब यांनी वेगळा दौरा केला. पण जर हेच मंत्री व मुख्यमंत्री आणि पवार जर एकत्रित पणे दौ-यावर येऊन पाहणी केली असती तर मदत व पुनर्वसन खाते,बाधित जिल्ह्याचे पालकमंत्री, सरकार एकत्र आले असते व कोकणवासीयंना ख-या अर्थाने न्याय देता आला असता. तसेच समाधानकारक मदतही जाहीर करता अली असती. परंतु, जसे महाविकास आघाडी सरकारमध्ये समनव्य नाही त्याचप्रमाणे सरकारच्या दौऱ्यामध्येही समन्वयाचा अभाव दिसून आला. पण आता कोकणाला मदत देण्यात तरी किती समन्वय राहील हे पाहावे लागेल, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
माणगाव मधील मोरबा येथील सुर्ले आदीवासी पाडा तर पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे. तेथील गावक-यांचे संसार उघडयावर आले आहे. आबलृवृध्दांची अवस्था दयनीय झाली असल्याचे सांगताना दरेकर म्हणारे की, पुनर्वसनासाठी जिल्ह्याला दिलेली सुमारे ४५ कोटी किंवा ४८ कोटी मदत एका गावाच्या पुनर्वसनासाठी देखील पुरेशी नाही. चौल, नागाव, थेरोंडा ही मच्छीमारांची गावे संपूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांची मासेमारी संपण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे एका गावाला पुरणार नाही अशी मदत एका जिल्ह्यासाठी सरकार देणार असाल तर सरकारने ही कोकणवासीयांची थट्टा लावली आहे का असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.भाजपच्या माध्यमातून आमचे आमदार कोकणाचा दौरा करत आहेत. दहा ते बारा आमदार कोकणात ठाण मांडून बसले आहेत. कोकणवासियांना सर्व सेवाकार्य भाजपच्या वतीने सुरू केल्याचे सांगताना दरेकर यांनी सांगितले की, सरकार किती गतीने काम करेल याबाबत आम्ही साशंक आहोत. वादळाला पाच- सहा दिवस झाले तरीही अजूनही पाण्याच्या जलवाहिन्या बंद आहेत. वीजेचे खांब दुरुस्त झाले नाहीत. रस्ते तसेच उखडलेले आहेत. घरांवर अजूनही पत्रे लावले नाहीत.
काल आम्ही आंजर्ले गावी गेल्यावर तेथील महिलांनी पाणी योजना बंद असल्याचे सांगितल्यानंतर आम्ही सरकारवर अवलंबून राहिलो नाही. तर तातडीने आमच्या माध्यमातून जनरेटरची व्यवस्था केली. त्यामुळे आंजर्ले गावाला पाणी सुरू झाले. कोकणवासियांना मानवतेच्या भावनेतून मदत करण्यासाठी आमच्या पक्षाची मोठी साहित्य- सामग्री लवकरच याठिकणी पोहचणार आहे .त्यामुळे आम्ही आमच्याकडून मदतीमध्ये काही कमी पडू देणार नाही. मात्र, सरकारने आता कोकणाला न्याय दिला पाहिजे. केवळ कोकणाच्या तोंडाला पाने पुसून चालणार नाही. कोकणची जनता आता हे सहन करणार नाही. निसर्ग वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी भाजपच्या माध्यमातून १६ ट्रक पत्रे देण्याता येणार आहेत सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ही सर्व मदत जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या मार्फत नुकसानग्रस्त गावे व नागरिकांपर्यत पोहचविण्यात येईल. त्याचप्रमाणे अधिक मदतही लवकर भाजपाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.