कोकणाचे हरवलेले वैभव आणि आर्थिक सुबत्ता पुन्हा मिळवून देऊ

मुंबई नगरी टीम

मुंबई  : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. आज घर उध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छिमार उद्ध्वस्त झाले आहेत आणि आता पुन्हा या कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या आपल्या दौ-यात कोकणाचे जे विदारक चित्र पाहिलं ते कुठेतरी आपल्याला बदलायचे आहे, कोकणवासियांना तात्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून आपण सारे मिळून कोकणाला पूर्वस्थितीत आणू… किंबहुना कोकणाला वैभवाचे दिवस पुन्हा आणू… असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला. चक्रिवादळामुळे झालेले कोकणाचे अतोनात नुकसान,शासनाने कोकणवासियांच्या तोंडाला पाने फुसण्याचा केलेला प्रकार, तसेच शासनाकडून असलेल्या कोकणवासीयांच्या अपेक्षा, आणि सध्या कोकणवासीय जगत असलेले खडतर जीवन याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी फेसबुकला लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

निसर्ग वादळामुळे कोकणाला मोठा फटका बसला असून बागा संपूर्णतः उद्धवस्त झाल्या आहेत. बागायतदारांना मदत करण्यासाठी मुंबईतील तरुणांच्या समूहाने आणि सेवाभावी समूहाने मदतीसाठी पुढे यावे. बागायतदारांना संकटात साथ द्यावी.दुःखातही सुख जाणता येईल या भावनेतुन बागायतदारांना मदत करण्यासाठी श्रमदानातून पर्यटन करावे असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. दरम्यान मी कोकण नावाचे अभियान सुरू केले आहे अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानांतर्गत प्रकल्प तयार करणे, पर्यटनास चालना देणे,मार्केटिंग करणे नवनवीन उद्योगांना महसूल उपलब्ध करून देणे या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. मी कोकण या अभिनयाच्या माध्यमातून कोकणात आमूलाग्र क्रांती घडेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केलाकोल्हापुरात महापूर आला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ आला, तसेच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला मदतीचे सर्व निकष बदलून तातडीने मदतीचा हात दिला होता. परंतु दुर्दैवाने या शासनाने तातडीने कोकणासाठी कोणतीही मदत दिलेली नाही. याचे शल्य मनात आहे. कोकणाला उभारी देण्यासाठी दीर्घकालीन काम करणे आवश्यक आहे. म्हणूनच मुंबई, ठाणे,पुण्यातील चाकरमान्यांनी आता कोकणाला मदत करण्यासाठी पुढे यायचं आहे. कोकणात फलोत्पादन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी दिशादर्शक प्रकल्प अहवाल तयार करून कोकणला उभारी देऊ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

कोकणला निसर्ग वादळाने झोडपले यामुळे संपूर्ण रायगड रत्नागिरी किनारपट्टी उद्ध्वस्त झाली. निसर्गसंपन्न कोकण पर्यटन प्रेमींचे कोकण आज विस्कळीत झालं, असे असताना कोकणच्या माणसाला धीर देण्याची आणि आधाराची आवश्यकता आहे. कोकणवासीय मुंबई, ठाणे, परदेशात कुठेही असो जेव्हा संकट आलं तेव्हा मदतीचा हात सेवाभावी भावनेतून दिला आहे.हा इतिहास आहे.अशा वेळी कोकणवासीय सर्वांच्या मदतीला धावून जातो असे असताना याला देखील हात देण्याची विनंती या फेसबुक लाईव्ह माध्यमातून दरेकर यांनी केली.कोकणावर आज  आभाळ फाटलं आहे, असे असताना ठिगळे लावून चालणार नाही. कोकणाच्य उभारीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येणे आवश्यक आहे, असे आवाहनही फेसबुक लाईव्ह द्वारे दरेकर यांनी केले.निसर्ग वादळाच्या तडाख्याने रायगडमधील १५ तर  रत्नागिरी मधील ९ तालुके बाधित झाले आहेत.त्याचबरोबर रायगडमधील १९०० ते २००० गाव आणि रत्नागिरीतील  ८०० गावं बाधित झाले आहेत.रायगड जिल्ह्यात १ लाख ८१ हजार घर अंशतः बाधित झाले असून रत्नागिरी, दापोली आणि मंडणगड येथे जवळपास ४० हजार घरं बाधित झाले आहेत.रायगडमध्ये एकूण १८ हजार घरं शंभर टक्के म्हणजेच पूर्ण बाधित असून जवळपास ९०० घरं रत्नागिरीत बाधित आहेत.बागाच्या बाबतीतही मोठे नुकसान झाले असून १६ हजार ६० हेक्टर इतके नुकसान झाल्याचे रायगड जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मंडणगड -दापोली परिसरात ४ ते ५ हेक्टर नुकसान झोले आहे.याबरोबर विजेचे पोल उद्ध्वस्त, पाण्याच्या योजना बंद, वीज यंत्रणा ठप्प,मच्छीमार बांधवांच्या दोनशे ते अडीचशे बोटींचे नुकसान, जाळ्या खराब झालेल्या आहेत. अशा उध्वस्त अवस्थेत संवेदनशील व सहृदय महाराष्ट्राने पुढे यावे असे आवाहन दरेकर यांनी केले.

Previous articleअखेर सत्य पुढे आलेच… १३२८ कोरोना मृत्यूची नोंद!
Next articleसहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या