..तर पालकमंत्री व  मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचाही राजीनामा घेणार का !

मुंबई नगरी टीम

नवी मुंबई  : कोरोनाच्या वाढत्या प्राद्रुर्भावाचा ठपका ठेऊन महापालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. पण यामुळे या संकटमय परिस्थितीत कोविड योध्दे म्हणून काम करणा-या या सनदी अधिका-यांचे मनोधैर्य खचू लागले आहे.जर आयुक्तांची बदली करण्याचा न्याय सरकार लावणार असेल तर संबंधित जिल्ह्याचा पालक मंत्री व त्या खात्यांच्या मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचाही राजीनामा सरकार घेणार का असा रोखठोक सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.जर मंत्र्यांचे राजीनामा घेतले तर महाराष्ट्रात कोरोनाची वाढती व गंभीर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचाही राजीनामा आता जनतेला मागावा लागेल असा इशाराही दरेकर यांनी आज दिला.

नवी मुंबई महापालिका परिसरात गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वाढत्या प्राद्रुर्भावाचा आढावा घेऊन सद्यस्थिती काय आहे, महापालिका कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत, आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे कार्यान्वित होत आहेत आदि विषयां सदर्भात दरेकर यांनी तपशीलवार माहिती घेतली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात बैठक आयोजित करून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि महापालिका प्रशासनाकडून कोरोना संदर्भात सविस्तर माहिती घेण्यात आली. आयुक्तांनी नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे संगणिकृत सादरीकरण केले. या बैठकीनंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, संदीप नाईक,चेतन पाटील आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, आयुक्तांच्या बदल्या अशाप्रकारे या आधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाल्या नाहीत. आयुक्तांच्या बदल्या करणे हे शासनाला आणि शासन प्रणालीला अशोभनीय आहे. कोरोना परिस्थितीत अधिका-यांच्या बदल्या हा उपाय नाही. एखादा अधिकारी सहा- सहा महिने तेथील कार्यप्रणाली समजून एखादी रचना उभी करतो. पण त्यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे संपूर्ण व्यवस्था विस्कळीत होते. कोरोना परिस्थितीला जिल्हाधिकारी व आयुक्त यांना जबाबदार ठरवित असताना सरकारने काय केले याचे सरकारने पहिले आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देतानाच बदल्यांचा राजकारणामुळे जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याची टिकाही दरेकर यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारकडून बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका या यंत्रणा पुरेश्या असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या यंत्रणांच्या अनुपलब्धतेमुळे जनतेमध्ये बोंब आहे व नाराजी आहे, हा केवळ विसंवाद आहे. त्यामुळे रुग्ण, जनता आणि महापालिकेतील विसंवाद प्रशासनाने तात्काळ दूर करावा अशी ठाम भूमिका  प्रवीण दरेकर यांनी मांडली. जनतेला आरोग्य यंत्रणेतील माहिती सुलभरित्या प्राप्त होण्यासाठी यासाठी पब्लिक डोमेनध्ये संपर्क क्रमांकासह कुठल्या हॉस्पिटलची काय जबाबदारी आहे याबाबत माहिती द्यावी. रुग्णवाहिका,व्हेंटिलेटर,ऑक्सिजन इत्यादी आरोग्य विषयक बाबी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून जबाबदर अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक सार्वजनिकरित्या जाहीर करावा अशा सूचना देण्यात आल्या असून याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाला प्रतिबंध म्हणून वापरले जाणारे रेमेडीसीवेर हे इंजेक्शन सुमारे ४० ते ४५ हजारांचे आहे. हे इंजेक्शन सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसून इंजेक्शनचा खर्च महापालिकेने उचलावा अशी मागणी करण्यात आली. तरी सामान्य जनतेची आर्थिक समस्या लक्षात घेता या  इंजेक्शनचा खर्च महापालिका उचलणार असे आश्वासन नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई महापालिका लौकिक असणारी सक्षम महापालिका म्हणून देशभर ओळखली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत आयुक्तांनी केलेल्या  सादरीकरणातून चांगल्या प्रकारच्या उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत असे निदर्शनास आले. महापालिका आणि जनता यांचा समन्वय व्हावा यासाठी इनोवेटीव आयडिया मोबाईल ॲपच्या माध्यमातून केल्या जात आहेत.परंतु खालच्या स्तरावर ज्या गोष्टींची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, त्यांच्या कमतरता आणि उणीवा आजही जाणवत आहेत. तसेच कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांचे उपचारांअभावी हाल होत आहेत. तरी ऐरोली, वाशी, नेरूळ याठिकाणी कोरोना व्यतिरिक्त असणा-या रुग्णांसाठी हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी आजच्या बैठकीत केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

दरेकर यांनी सांगितले की, नवी-मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालयातील आरोग्य संबधीत उपाययोजनांची माहिती देताना दरेकर म्हणाले, कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध आहेत, परंतु मनुष्यबळाचा तुटवडा आहे. या रुग्णालयात जवळपास साठ ते सत्तर डॉक्टर आणि अडीचशे ते तीनशे नर्सेसचा तुटवडा असून बाराशे पॅरामेडिकल स्टाफ यांचाही  तुटवडा आहे. असे असताना मनुष्यबळ कमतरता असताना फक्त बेड लावुन काय उपयोग असा सवाल दरेकर यांनी केला. येथे डॉक्‍टर उपलब्ध होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून या दौऱ्याच्या माध्यमातून या कामांना गती मिळेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील सिडको क्वारंटाईन सेंटरला दरेकर यांनी भेट दिली. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, क्वाराटाईन सेंटर झोनमध्ये कायद्याचे पालन होणे आवश्यक आहे. जनतेच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय,त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. विलगीकरण केंद्राची कंटेनमेंट झोनप्रमाणे काळजी घेतली जावी, यादृष्टीने सूचना देण्यात आल्या. तसेच स्क्रीनिंग आणि टेस्टिंग योग्य पध्दतीने व्हावी. अशाप्रकारे नियोजन आणि समन्वयाच्या बाबी आजच्या बैठकीच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आशा दरेकर यांनी व्यक्त केली.कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाला असून सध्याच्या परिस्थितीत दैनंदिन संसार खर्च भागविताना त्याच्या समोर अनेक अडचणी आहेत, असे असताना महानगरपालिकेचे मालमत्ता कर, पाणी कर असे विविध कर आहेत. हे कर भरण्याची त्याची क्षमता नाही. तरी त्यामधून सूट देण्यात यावी किंवा थोडा अवधी देऊन हे बिल माफ करता येईल का याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

Previous articleदेशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी
Next articleराज्यात कोरोनाचे ६५ हजार ८२९ ॲक्टीव्ह रुग्ण