मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री मातोश्रीवरून कामकाज करीत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामाची स्तुती केली करत विरोधकांना चोख उत्तर दिले आहे.मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून,कोरोना संकट,रुग्णसंख्येवर ते व्यवस्थित लक्ष ठेवून असल्याचे पवारांनी सांगितले.
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आढावा घेतला आहे. असे असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कारभार करीत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामाची स्तुती करीत पवार यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून,कोरोना संकट,रुग्णसंख्येवर ते व्यवस्थित लक्ष ठेवून आहेत.लातूरमध्ये भूकंप झाला. तो एका जिल्ह्यातील काही भागापुरता सिमीत होता. त्यामुळे तिथे जाऊन बसण्याची गरज होती.सध्या असणारे कोरोनाचे संकट हे मोठे आहे,त्याचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. असा वेळी मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले,तर इतर जिल्ह्यातील तातडीने निर्णय घेण्याच्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे कॅप्टनने एका ठिकाणी बसून,सगळी टीम काम करते की नाही,त्यावर नियंत्रण ठेवावे असा आमचा आग्रह आहे.काही कमतरता असेल तर पालकमंत्री इथून गेले की ते मुख्यमंत्री आणि संबंधित घटकांशी उद्या बोलतील असेही पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे हे त्यांच्या टीमकडून काम करुन घेत आहेत.सर्वांशी संवाद आणि समन्वय ठेवून मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे हे निर्णय घेत आहेत.मी अनेक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. त्यांची चौकशी करणे, मदत करणे या भावनेने मी आलो आहे.उद्या मी मुंबईला गेलो की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन,ज्या कमतरता आहेत, त्यावर चर्चा करू,यावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री ताबडतोब निर्णय घेतील असा निश्वास पवार यांनी व्यक्त केला.केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही असे सांगतानाच आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे.जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असून राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे.देशातील साधारण पाच-सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे असेही पवार म्हणाले.कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसावरून ३० दिवसावर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातले आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे अशा शब्दात जनतेचे कौतुकही पवार यांनी केले.खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल अशी शक्यत पवार यांनी व्यक्त केली. मालेगाव, धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल अशी खात्री पवार यांनी व्यक्त केली.