मुंबई नगरी टीम
मुंबई : खाजगी वीज कंपन्या,महावितरण,बेस्ट यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे.या कंपन्यांनी वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसेच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये.राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज्यातील वीज कंपन्यांनी सध्याच्या संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढीव बिल आकारणी केल्याने जनतेचे कंबरडे मोडले याच पार्श्नभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.कोरोनाच्या ह्या लढाईत बहुदा राज्य सरकारचे एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.असे राज ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत.
मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल. त्यात टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापनं देखील गेली ३ महिने बंद होती तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरु केली आहे अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना तिथे ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे.कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील पण ह्या अशा विषयांत जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज्याला महसुलाची अडचण आहे हे सर्वाना मान्यच आहे पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणं हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच ह्या विषयात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालावं आणि ह्या वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसंच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये.राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल अशा शब्दात राज ठाकरे यांनी इशारा देत,विषय संवेदनशील आहे आणि सरकार देखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल ह्याची मला खात्री आहे असेही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.