मुंबई नगरी टीम
रोहा : राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढत आहे. तरीही या महाविकास आघाडीच्या संवेदना गोठलेल्या आहेत. कारण राज्यात अश्या घटना रोज घडत असताना सरकारला मात्र अशा गंभीर घटनांची नोंद घ्यावीशी वाटत नाही. पोलिस प्रशासनावर सरकारचा कुठलाही वचक नाही व धाक राहिलेला नाही. त्यामुळे रोहा येथील प्रकरणातील गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करुन हा खटला जलदगतीने चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज तातडीने सकाळी त्या घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासमवेत माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, महेश मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी दरेकर यांनी सांगितले की, रोहामध्ये घडलेली ही घटना अतिशय हृदय हेलावणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असे कृत्य नराधामांनी केले आहे. एका निष्पाप मुलीवर नराधामांनी बलात्कार करुन तिची क्रूरपणे हत्या केली. राज्यामध्ये महिलांविरुध्द अशा भयंकर घटना रोज घडत असताना सरकार नावाची यंत्रणा गप्प बसली आहे, सरकारकडून कुठलेही भाष्य होत नाही. जनतेला आत्मविश्वास व धीर देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील मुली, महिला या घरापासून लांब शाळेत, शेतावर व बाजारकामासाठी बाहेर जात असतात पण आता या गंभीर परिस्थितीत वाडया वस्त्यांवरील आपल्या मुलींना तरुणींना, महिलांना घरातून बाहेर पाठावयाचे का…असा प्रश्न त्यांच्या आई वडिलांना पडला आहे. कारण राज्यामध्ये भयावह वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणांची सरकारने दखल घ्यावी व या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करुन दोषींन कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी करतानाच या प्रकरणात भाजपच्या वतीने चांगला वकील देण्यात येईल व मुलींच्या कुटुंबियांना न्याय मिळून देण्यात येईल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
रोहा येथील तांबडी तालुक्यातील त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या कुंटुंबियांची दरेकर यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणातील दोषींना शासन होईलच असे आश्वासन कुटुंबियांना देण्यात आले. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांबद्दल कुटुंबियांच्या मनात शंका आहेत. कारण ती दुदैर्वी मुलगी खेळाडू होती. कबड्डी, कराटे खेळणारी होती, त्यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा असा अंदाज तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्याची माहितीही दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.