धनंजय मुंडे म्हणाले…मुंबईतील कालच्या पावसाचा अनुभव सगळ्यात भयानक होता !

मुंबई नगरी टीम

मुंबई : काल मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले,कार्यालयातुन घरी परतणा-या कर्मचा-यांना तर चार ते पाच तास एकाच अडकून रहावे लागले असतानाच कालच्या पावसाचा फटका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही बसला.मुंबईत पक्षाच्या बैठकीसाठी सकाळी १० वाजता निघालेल्या मुंडेंना पुर्व मुक्त मार्गावर तीन तास ताटकळत थांबावे लागले.मुंबईचा पाऊस तसा मला नवीन नाही, पण आजचा अनुभव सगळ्यात भयानक होता असे मुंडे यांनी कालच्या पावसातील अनुभव सांगितला.

मुंबईत  काल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच दैना झाली तर दुसरीकडे त्याचा फटका अनेक बड्या व्यक्तींना बसल्याचे पुढे आले आहे.कामावरून घरी परतणा-या कर्मचा-यांचे या पावसामुळे अतोनात हाल झाले.राष्ट्रवादी पक्षाची महत्वपूर्ण बैठक काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयेजित करण्यात आली होती.या बैठकीला सर्व मंत्री पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.ही बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घरी परतत असताना मुंबईच्या रस्त्यावर असलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ समाज माध्यमात शेअर करून मुंबईतील पावसाचे असलेले भयानक चित्र दाखवले आहे.कालच्या पावसाचा फटका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही बसला.या बैठकीसाठी सकाळी १० वाजता परळीहून निघालेल्या मुंडेंना मुंबईतील पुर्व मुक्त मार्गावर तीन तास अडकून एकाच जाग्यावर थांबावे लागले. मुंबईचा पाऊस तसा मला नवीन नाही, पण आजचा अनुभव सगळ्यात भयानक होता असे मुंडे यांनी कालच्या पावसातील अनुभव सांगितला.

पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काल सकाळी १० वाजता परळीतून निघालो,पुणे संपताच पावसाचे थैमान सुरू झाले.मुसळधार पाऊस आणि त्या पेक्षा भयानक होता तो सोसाट्याचा वारा. ज्यामुळे आमची गाडीही हलायला लागली होती. रस्त्यात जागोजागी लहान मोठी झाडे पडली होती. जाहिरातीचे बोर्ड रस्त्यावर आले होते,त्यातुन रस्ता काढत मुंबईच्या ईस्टर्न फ्री वे ला आलो….. अन ट्रॅफिक मध्ये अडकलो….. थोड्याच वेळात ट्रॅफिक संपेल ही आशा अर्धा तास वाट पाहिल्यावर संपली….. ६ च्या मीटिंगचा वेळ होऊन गेला होता. फक्त ५०० मीटरवर गेलो की आमचा पुर्व मुक्त मार्ग संपणार होता, पण त्यासाठी लागले ३ तास….. फ्री वे संपला की फास्ट जाऊ असा अंदाज असल्याने पुढच्या  सर्व गाड्या माघारी जात असल्या तरी आम्ही नेटाने पुढे गेले. ३ फूट पाणी असले तर मोठी गाडी ( लँड क्रुझर ) असल्याने सहज पुढे जाऊ असा विश्वास होता.

मात्र जसे जसे पुढे जाऊ तसे तसे पाणी वाढत होते,एकवेळ तर गाडीचे बोनेट पाण्याखाली गेले. एसी बंद केल्याने आत गर्मी वाढली होती. खिडक्या उघडायची सोय नव्हती. मध्येच समोर बंद पडलेली गाडी आली की आता आपली गाडी ही बंद पडणार ही भीती…. डाव्या बाजूने जावे तर उघड्या मेनहोल किंवा नाली अथवा खड्या मध्ये जायचा धोका… जसे जसे पुढे जाऊ तसे तसे पाणी वाढत होते, काही गाड्या पाण्यात तरंगत होत्या, उडत होत्या….. आमच्या चालकाने कौशल्याने गाडी चालवली बंद न पडू देता तो ती गाडी चालवत होता. पाण्याचा वाढता वेग पाहून अखेर सीएसटीएम स्टेशन वर ( १८ नंबर प्लॅटफॉर्म साईड ) थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला, तेथून चालत मुख्य  स्थानकात आलो आणि वेगळ्या गाड्या मागवून सुरक्षित घरी पोहचलो. या निम्मिताने मुंबईच्या भयानक पावसाचे रूप पहायला मिळाले असे कालच्या पावसाचे कथन मुंडे यांनी केले.

Previous articleमातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत आरोग्यमंत्री उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत
Next articleरामभक्तांवर कारवाई करून सरकारने मोगलाईचे दर्शन घडविले