मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पालिकेच्या मुलुंड चेक नाका येथील कोविड सेंटरला भेट देऊन,तिथे सुविधा देताना होत असल्याचा गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. तसेच कोविड सेंटर उभारणीत दिलेले ठेके, त्यांचे करार तपासून त्याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत कोविड सेंटर उभारताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ज्यांचा आरोग्याशी काहीही संबंध नाही त्यांचा सहभाग असलेल्या व्यक्तीच्या ट्रस्टला हे काम दिले आहे. ही संस्था ना औषधे देते ना सुविधा. पण ती डॉक्टर्स आणि नर्स पुरविते. ही संस्था या कामाशी संबंधित आहे का ? की पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना ठेका दिला ? पालिकेने ठेका योग्यप्रकारे दिला का ? याबाबत आमचे स्थानिक नगरसेवक, आमदार माहिती मिळवतील आणि सत्य जनतेसमोर मांडले जाईल,”असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सुविधा असो- नसो भाडे सुरूच
मुलुंड चेक नाक्यावरील सेंटरमध्ये ४०० खाटांचे हे सेंटर ७ जूनला सुरू होणार होते. पण दोन महिने झाले तरी येथे फक्त ५० खाटा आहेत, अद्याप आयसीयू, व्हेंटिलेटर यांचा पत्ताच नाही. पण हे सेंटर सुरू झाल्यापासून येथे प्रत्येक खाटामागे ५० टक्के भाडे म्हणजेच २०० खाटांचे भाडे दिले जाते आहे. ही वस्तुस्थिती या कोविड केंद्राच्या प्रमुखांनी मान्य केली आहे. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. मुंबईकर जनता घामाच्या पैशातून कर भरते आणि त्यांचा हा पैसा पालिकेचे वरिष्ठ अधिकारी ठेकेदारांशी संगनमत करून भ्रष्टाचार करीत आहेत,’ असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.
डॉक्टर भरीतीवरही प्रश्नचिन्ह
डॉक्टरांच्या भरतीबाबत सुद्धा पालिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘कोविड सेंटरसाठी महापालिकेने डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ थेट घेणे अपेक्षित होते. पण तसे घेतले जात नाहीत. जे घेतलेत त्यांचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे हा विषय महापालिकेच्या निदर्शनास आणून आम्ही त्यांचे पैसे द्यायला लावले. आता तर या सर्व विषयांमध्ये ही एजन्सी मध्यस्थ असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचा दावाही दरेकर यांनी केला आहे.
मोठा गैरप्रकार
मिठागर येथे ३०० रुग्णांची क्षमता असलेले सेंटर उपलब्ध आहे. तेथे जवळच १०० रुग्णाच्या क्षमतेचे सेंटर आहे आणि तरीही येथे दीडशे रुग्ण कशासाठी पाठवले आहेत? यामध्ये मोठा गैरप्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.