मुंबई नगरी टीम
बारामती : अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर नाराज असलेल्या पार्थ पवार यांच्यामुळे पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडल्याचे समजते.
अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी विधान केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना पार्थ यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचे वक्तव्य केले होते.पवारांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार नाराजी असल्याची चर्चा होती.गेली काही दिवस या प्रकरणावरून अनेक चर्चा सुरू होत्या अखेर या वादावर पडदा पडल्याचे समजते.या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दुरध्वनीवरून चर्चा झाल्याने हा वाद निवळल्याचे सांगण्यात येते.
पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर नाराज असलेले पार्थ पवार यांनी पवार कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली होती. काका श्रीनिवास पवार यांची त्यांच्या निवासस्थानी पार्थ यांनी भेट घेतली त्यावेळी पार्थ यांना झाल्या प्रकाराबाबत समजविण्यात आल्याचे समजते.तर उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार,काकी शर्मिला पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पार्थ यांना समजविण्यात आल्याने गेली काही दिवस सुरू असलेल्या या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.