मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यावर असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठणे भाजपतर्फे गणेशोत्सवात १० दिवसीय मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर यांच्या संयुक्त विद्यमाने या १० दिवसात मोफत विविध चाचण्यासह, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेला गणेशोत्सव एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प दहिसर मधील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठणे भाजप आणि सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १० दिवस आरोग्य शिबीर आयोजित करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार येत्या १० दिवस हा आरोग्य उत्सव साजरा केला जाणार आहे. भाजप मागाठणे विधानसभा अध्यक्ष दिलीप उपाध्याय,माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्यातर्फे संपूर्ण १० दिवस व्यवस्था संभाळली जाणार आहे. २३ ऑगस्ट रोजी फिरत्या युनिटद्वारे डॉक्टरांच्या उपस्थितीत थर्मल स्क्रिनिंग,मास्क,सॅनिटायझर-साबण वितरण केले जाईल. २४ ऑगस्टला आरोग्य चाचणी, २५ ऑगस्ट रोजी फिजिओथेरपी सत्र, २६ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर, २७ ऑगस्ट रोजी महिलांसाठी स्त्री-रोग शिबीर, सॅनिटरी नॅपकिन वितरण व मासिक पाळी स्वच्छता शिबिर, २८ ऑगस्टला नेत्र तपासणी शिबिर, २९ ऑगस्ट रोजी सर्वसामान्य आरोग्य तपासणी, ३० ऑगस्ट रोजी मधुमेह-रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजार शिबीर, ३१ ऑगस्टला श्वसन रोग व ऑर्थो शिबीर, १ सप्टेंबर रोजी लसीकरण व मुलांसाठी जंतचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी जी ९ व्यायामशाळा, ओवरीपाडा,शैलेंद्र नगर, दहिसर पूर्व येथे नियोजित दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. २३ ऑगस्ट रोजी गणेश आगमन सोहळ्यानंतर या शिबीराची सुरुवात होईल. तसेच ३० ऑगस्टला श्री सत्यनारायण महापूजा आणि १ सप्टेंबर रोजी कोरोनाच्या संदर्भातील सर्व नियम व अटी पाळून गणेश विसर्जन सोहळा पार पडणार असल्याचीही माहिती माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी दिली आहे.