मुंबई नगरी टीम
दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधींचं राहणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व बदलावरून काही दिवसांपासून चर्चा रंगलेली होती.यासंदर्भातील पत्र देखील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पाठवले होते.या पार्श्वभूमीवर आज दिवसभर सुरू असल्येल्या कार्यकारिणीच्या बैठकीत रणकंदन पाहायला मिळाले.अखेर सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला.
सोनिया गांधींनी आपल्याला या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी भूमिका आजच्या बैठकीत मांडली होती. पंरतु माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व अन्य नेत्यांनी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी,असे मत व्यक्त केले होते.मात्र काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत मागणी केल्याने सोनिया यांनी आपण अध्यक्षपदी राहण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेस पक्ष्याध्यक्षाचा पुढचा चेहरा कोण?असा प्रश्न निर्माण झाला होता. दिवसभराच्या खलबतांनंतर सोनिया गांधी यांचेच नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले. तसेच राहुल गांधींना अध्यक्ष पदाबाबत विचार करण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.तर काँग्रेसमधील गांधी घराण्याशी निष्ठावान असणाऱ्या नेत्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांपैकी एकाने सांभाळावे अशी भूमिका घेतली. त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये दुमत पाहायला मिळाले.