राज्यात ई-पासची अट रद्द होण्याची शक्यता कमीच !

मुंबई नगरी टीम

ठाणे : अनलॉक-३ च्या मार्गदर्शक नियमांनुसार व्यक्ती,माल आणि सेवा यांच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वर्दळीवर कोणतेही निर्बंध लावू नयेत असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले असले तरी महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही असे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने तसेत राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात अजून काही दिवस प्रवासासाठी ई-पासची अट कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवाय सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता  आहे.

व्यक्ती,माल आणि सेवा यांच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वर्दळीवर कोणतेही निर्बंध लावू नयेत असे निर्देश केंद्राने राज्यांना पत्र पाठवून दिले आहेत.त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.तर महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाणे येथील आढावा बैठकीत सांगितल्याने आंतरजिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केली जाण्याची शक्यता आता धुसर झाली आहे. तर मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकर सुरू होण्याची शक्यता नाही.आधी सर्व सुरु करायचे आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये,त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना नियंत्रणात  येत आहे ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका, कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन खुला करण्याची घाईगडबड केली आहे. मात्र महाराष्ट्रात  तशी घाई अजिबात करणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असेही  त्यांनी यावेळी सांगितले.कोरोना रोखण्यात जरी कौतुकाची थाप मिळत असेल तरी गाफील न राहता आपल्याला हा आकडा शून्यापर्यंत  आणायचा आहे. असे सांगतानाच कल्याण डोंबिवली मध्ये जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता ती रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या असल्याने येत्या २० ते २५  दिवसांत यामध्ये नक्कीच बदल दिसून येईल असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

Previous articleठरलं! सोनिया गांधीच काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी राहणार
Next articleअधिवेशनात आमदारांना फेस शील्ड,मास्क,हॅण्ड ग्लोव्हज घालावे लागणार