विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित जपत निर्णय घेणार : उदय सामंत

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा चर्चेत होता.यावर अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेत परीक्षा कशा घेतल्या जातील यावर निर्णय घेतला जाईल. तसेच न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा महाराष्ट्र सरकार स्वागत करते, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याबाबत अधिक बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करतो. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा विचार होता.तसेच युवा सेनेने देखील ही भूमिका मांडली होती.राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऐच्छिक मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना  परिक्षा द्यायची आहे ते देऊ शकणार होते.परीक्षा रद्द करण्याचे सरकारने म्हटले नव्हते. पण कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पदवी देण्याचा निर्णय होता. मात्र आता न्यायालयाने निर्णय दिला असून त्याचा आम्ही आदर करतो. या निकालानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे सांगितले आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन समितीने यूजीसीकडे परीक्षेची मुदत वाढवून देण्याची मागणी करावी. यूजीसीने त्यासंदर्भात निर्णय द्यावा”, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने कोणतेही संकट नसताना हा निर्णय घेतलेला नव्हता, तर विद्यार्थी, पालक आणि सगळीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला होता. आपत्ती व्यवस्थापनाने तो अंतिम केला होता. पण न्यायालयाच्या निकालाचा आपण आदर करतो त्यामुळे परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करु.आरोग्याची काळजी घेऊन कशी परीक्षा घेतली जाईल याबाबत प्रत्येक विद्यापीठात जाणार आणि पालक, कुलगुरू, विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करणार. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित जपत निर्णय घेणार आहोत न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यातून आता मार्ग काढून पुढे जावे लागेल. कंटेन्मेंट झोन, लॉकडाउन, वाहतूक याचा देखील विचार करावा लागेल”, अशी भूमिका यावेळी उदय सामंत यांनी मांडली.

Previous articleशहरी आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय
Next articleकेवळ युवा सेनेच्या आग्रहाखातर सरकारचा एकतर्फी निर्णय