मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार गदारोळ झाला.ग्रामपंचायत सुधारणा विधेयकावरून सभागृहात सत्ताधारी विरोधक आमने सामने आल्याचे चित्र होते.ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.या गदारोळातच ग्रामपंचायत सुधारणा विधयेक मंजूर झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मांडले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला. हा वाद उच्च न्यायालयात असताना हे विधेयक आणू नका, अशी भूमिक फडणवीस यांनी मांडली. हे विधयेक मांडून सरकार न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेत आहे.न्यायालच्याच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करा,अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.राज्यपाल निवडताना काही जाहिरात देतात का ? जो योग्य व्यक्ती असेल त्यांचीच नेमणूक केली जाते असे सांगतानाच, आम्ही प्रशासक म्हणून खासगी व्यक्तीची नियुक्ती करीत नाही,सरपंचांना मुदत वाढ देता येत नाही तसा नियम असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.या प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याने गदारोळ झाला. या गदारोळातच ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर करण्यात झाले.
दरम्यान, विरोधी पक्षाने आपली भूमिका ठामपणे मांडत विधेयकावरील आपला आक्षेप कायम ठेवला. संख्याबळाच्या आधारे विधयेक रेटणे चुकीचे आहे. हा चुकीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही”, असे फडणवीस यांनी म्हटले. या जोरदार आक्षेपानंतर विरोधकांनी अखेर सभात्याग केला.