मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणावत हिने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला तरी तिला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणे ही धक्कादायक बाब असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तर मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सर्वच पक्षांनी निषेध नोंदवला पहिजे, असे अनिल देशमुख म्हणाले. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केले आहे.
“मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याला केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा पुरवते ही धक्कादायक बाब आहे. महाराष्ट्र केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा नाही. तो भाजप आणि जनतेचा देखील आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सर्वच पक्षांनी निषेध नोंदवला पहिजे”, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, कंगनाला केंद्राकडून मिळालेल्या या सुरक्षेबाबत तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार देखील मानले आहेत.
महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस यांच्यावर ताशेरे ओढणारे ट्वीट करत कंगना राजकीय तसेच कला क्षेत्रातील अनेकांच्या टीकेची धनी झाली आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत परतणार असून कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हान तिने दिले आहे. कंगनाच्या अशा बेताल व्यक्तव्यामुळे शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे. तर कंगनाने आपली मुंबईत येण्याची भूमिका ठाम ठेवली असल्याने केंद्राकडून तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता आणखी टीका टिप्पण्या होताना दिसत आहेत.