उपसभापती पदासाठी पुन्हा डॉ. नीलम गोऱ्हे यांना संधी ; भाजपचे भाई गिरकर रिंगणात

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर केली आहे.उद्या होणा-या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून पुन्हा डॉ.नीलम गोऱ्हे यांनाच संधी देण्यात आली आहे.तर भाजपने भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी दिली आहे.विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.नीलम गोऱ्हे या विजयी होवू शकतात.

 पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर केली आहे.यासाठी उद्या निवडणूक होत असून,महाविकास आघाडीकडून डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तर भाजपकडून भाई उर्फ विजय गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विधानपरिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता डॉ. नीलम गोऱ्हे या सहज निवडून येवू शकतात.उद्या आवश्यकता पडल्यास उद्या दुपारी या निवडणूकीसाठी मतदान होवू शकते मात्र संख्याबळाचा विचार करता उद्या सकाळीच भाजपचे उमेदवार भाई उर्फ विजय गिरकर उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपसभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोनाचे अनेक निर्बंध असताना सत्ताधा-यांनी दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.उपसभापतींची निवड एकमताने कारावी अशी आमची भूमिका होती.पुढच्या अधिवेशनातही निवडणूक घेता आली असती.पण सदस्यांचा मतदानाचा हक्क जाणीवपूर्वक डावलून  लोकशाहीमध्ये निर्णय थोपण्याचे काम हे सरकार करत आहे.अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.कोरोनामुळे अधिवेशनासाठी अनेक ज्येष्ठ सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेत या अधिवेशनात उपसभापती निवडणूक घेऊ नये, अशी मागणी भाजपने अधिवेशनापूर्वीच सरकारकडे केली होती. अनेक सदस्यांना मदतानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल,त्यामुळे ही निवडणूक घेऊ नये अशी विनंती करणारे पत्र सभापतींना पाठवण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

७८ सदस्यीय विधान परिषदेत १८ जागा सध्या रिक्त आहेत.उर्वरित ६० पैकी २२ सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.तर  शिवसेना १४,राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, लोकभारती १, शेकाप-१,रासप-१,अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजपला शेकाप,रासप,आणि काही अपक्षांची साथ मिळू शकते त्यानुसार त्यांचे संख्याबळ २५ किंवा २६ वर जावू शकते तर महाविकास आघाडीचे संख्याबळ ३४ वर जात आहे.

Previous articleमहाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने सुरक्षा देणे धक्कादायक
Next articleकिमान संकटात तरी भ्रष्टाचार करू नका; सरकारवर फडणवीसांचा घणाघात