मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैत प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात टीकांचे सत्र सुरू झाले आहे. अनधिकृत बांधकाम असल्याने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून आज कारवाई करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार अहंकार आणि सूडबुद्धीने वागत असल्याची टीका केली आहे.कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून तिला पाठींबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.परंतु जी कारवाई सूडबुद्धीने होत आहे त्याचे समर्थनही आम्हाला करता येणार नाही,असे प्रवीण दरेकर म्हणाले.
सरकार अहंकार आणि सूडबुद्धीने वागत आहे.एका दिवसात असे काय झाले की कारवाई करावी लागली. दोन दिवसांनी कारवाई केली असती तर काय झालं असतं का?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी सरकार आणि महापालिकेला केला आहे. आपल्या देशात घटना आहे, लोकशाही आहे. कायदा हातात घेऊन कारवाई करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तर कोरोनाच्या परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारने ही भूमिका घेतली असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
कंगनाने एका पाठोपाठ एक ट्वीट करत मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी केली. त्यानंतर जो वाद सुरू झाला तो अद्याप कायम आहे. कंगनाचा हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील घेण्यात आला. तर काँग्रेस आणि शिवसेनकडून तिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत ठरवून त्यावर पालिकेने आज कारवाई केली. त्यामुळे आताच कारवाई का केली? असा सवाल विरोधकांकडून उपास्थित केला जात आहे.