मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला होता,अशी माहिती मिळाली आहे. तर हा धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला कोलकता मधून अटकही करण्यात आले आहे. पलाश बोस असे या व्यक्तीचे नाव असून त्याला शहरातील टॉलीगंगे भागातून अटक केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोनचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार,संजय राऊत यांना गुरुवारी धमकीचा फोन आला होता.कोलकता पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पलाश बोस असे या व्यक्तीचे नाव आहे. संजय राऊत यांना इंटरनेट कॉलिंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा अभिनेत्री कंगना राणावतचा समर्थक आहे म्हणून त्याने कॉल केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना देखील धमकीचे ९ फोन आले होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने कंगनापासून दूर राहण्याचा इशारा अनिल देशमुख यांना दिला होता. तर या सर्व धमकीच्या फोन कॉलचा तपास गुन्हे विभाग करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना राणावत हिच्या वादग्रस्त विधानांमुळे बॉलिवूडसह राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्यात सत्ताधारी पक्षातील संजय राऊत यांनीही कंगनावर टीका केल्याने हा वाद अधिक वाढला. त्यामुळे कंगना विरुद्ध राज्य सरकार असे एक चित्र पाहायला मिळत आहे. पंरतु आपल्यासाठी हा विषय आता संपला असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.