अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल;उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

मुंबई नगरी टीम

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार आणि विरोधक यांच्यात नवा वादंग उठण्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती, नोकरभरतीतील आरक्षण कायम ठेवावा. यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर पोस्ट लिहत आपली भूमिका मांडली आहे.

खा.उदयनयाने भोसले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढेच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे. या आधी मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तरी तिथे आरक्षण टिकवता आले. पण आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्काच बसला आहे. केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही वाईट वेळ मराठा समाजावर आली आहे. महाराष्ट्र सरकार ५० टक्क्यावरील आरक्षण देण्यासाठी कुठलीही विशेष बाब सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरले आहे. हे करत असताना राज्य सरकारने कुठलीही खबरदारी घेतली नाही.

सरकार कोणत्याही पक्षाचे असो ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मराठा आरक्षणाच्या प्रकरणातील अंतरिम आदेश हे जणू काही अंतिम आदेश आहेत. असाच हा निकाल दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना न्यायालयासमोर काय कागदपत्रे आहेत त्याची पूर्ण चर्चा झालेली नसताना इतका मोठा निर्णय हे मराठा समाजावर अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावे हाच मार्ग शासनासमोर आता आहे.

Previous articleकंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप,रिपाई आणि राज्यपालांचे समर्थन आहे का ?
Next articleधमकीचे सत्र सुरूच,शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला आला फोन