कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप,रिपाई आणि राज्यपालांचे समर्थन आहे का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.मात्र शिवसेनेने यात भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला आहे. कंगनाने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप,रिपाई आणि राज्यपालांचे समर्थन आहे ?, असा प्रश्न शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विचारला आहे.कंगनाच्या कार्यालयावर महानगर पालिकेने कारवाई केल्यानंतर भाजप,रिपाईने त्यावर टीका केली होती. तर राज्यपालांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यपालांच्या या भूमिकेवर अनिल परब यांनी प्रश्न उपास्थित केला आहे.

भाजप आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना असे म्हणायचे आहे का की, कंगनाचे अनधिकृत बांधकाम असेल तर तसेच राहू द्यावे त्याला हात नाही लावला पाहिजे. कारण ते कंगना राणावत हिचे आहे. कंगना राणावतचे कोणते ड्रग्स कनेक्शन असेल तर ते तिला विचारू नये. कारण ते कंगना राणावतचे आहे, असे भाजप आणि रामदास आठवले यांचे म्हणणे असेल तर त्यांनी खुलेपणाने तसे बोलावे, असे अनिल परब म्हणाले. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानांही जर असेच वाटत असेल तर त्यानींही तसे म्हणावे, असे आव्हान अनिल परब यांनी दिले.

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राजभवनावर बोलवून यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कंगना आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणावरून राज्यपाल केंद्राकडे अहवाल पाठवणार असे वृत्त समोर आले होते. दरम्यान, महानगर पालिकेचा कायदा काय आहे हे मनपा न्यायालयात सांगेल. अनधिकृत बांधकाम असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleकार्यकर्त्यांना खुशखबर : महामंडळावरील नियुक्त्या लवकरच होणार
Next articleअन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल;उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा