महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातयं : संजय राऊत

मुंबई नगरी टीम

मुंबई : काही महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबईला बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कंगनाचे कार्यालय बेकायदेशीर होते. केवळ तिचे बांधकाम पाडल्यामुळे सध्या एवढा कांगावा सुरू आहे. तर कंगनाच्या कार्यालय तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी केले जाणे हे हास्यास्पद असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

अभिनेत्री कंगना राणवात हिच्या बेकायदेशीर कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रात ‘उखाड दिया’ या मथळ्याखाली एक बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या मुद्द्यावरूनच कंगनाने संजय राऊत यांना न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे. पंरतु या प्रकरणात आपल्याला प्रतिवादी केले जाणे हे हास्यास्पद असल्याचे संजय राऊत म्हणाले. माझ्या व्यक्तव्यात इतकी ताकद असेल तर चीनने केलेले बांधकाम तोडले असते. काही महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबईला बदनाम करण्याची तयारी सुरू असल्याचे सूचक विधान देखील त्यांनी यावेळी केले.

न्यायालयीन लढाई आमच्यासाठी नवी नाही. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली घडलो आहोत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी सहन करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असल्याचे पाहायला मिळाले. तर आता ही लढाई न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचली असून हे प्रकरण आणखी कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleधनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ‘ढोल बजाओ,सरकार जगाओ’ आंदोलन
Next articleनाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राजकीय चर्चांना उधाण