धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ‘ढोल बजाओ,सरकार जगाओ’ आंदोलन

मुंबई नगरी टीम

सांगली : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.अशातच धनगर समाजानेही आपल्या आरक्षणाची मागणी आता सरकार पुढे लावून धरली आहे.त्यामुळे येत्या २५ सप्टेंबरला राज्यव्यापी ‘ढोल बजाओ,सरकार जगाओ’ आंदोलनाची घोषणा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.१० महिन्यापासून झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी धनगर समाजाकडून हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले जाणार आहे. सांगलीतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाचे रणशिंग फ़ुंकले आहे. २५ सप्टेंबरला पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत आंदोलन करणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर धनगर समाज आंदोलन करणार आहे. धनगर आरक्षणाची मागणी सरकारकडे करूनही गेल्या दहा महिन्यात शासनाने यावर कोणतेही पाऊल उचलेले नाही. तत्कालीन भाजप सरकारने धनगर समाजासाठी एका हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारने दिला नाही, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

दरम्यान, धनगर आरक्षणाच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे आता धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे महाविकास  आघाडी सरकार समोरील आव्हाने अधिक वाढताना दिसत आहेत.

Previous articleमराठा समाजाला दिलासा : आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकांसाठी असलेला लाभ मिळणार
Next articleमहाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातयं : संजय राऊत