नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राजकीय चर्चांना उधाण

मुंबई नगरी टीम

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अनेक मुद्द्यांवरून तापलेले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे.पंरतु आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आज याबाबत बैठक पार पडली,विशेष म्हणजे नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने मुंबई गाठत या बैठकीला हजेरी लावली.त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नाराज नेते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.या बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. प्रवेशसंबंधित नेत्याच्या प्रवेशाबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांचे म्हणणे काय आहे,स्थानिक नेत्यांची भूमिका काय ?याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर महाराष्ट्रातील भाजपातील मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते म्हटले तर नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत आहेत.एकनाथ खडसे यांची स्वपक्षातील नेत्यांवर असलेली नाराजी सध्या जगजाहीर आहे.

गेल्या काही दिवसांत एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला असल्याचे आरोप केले आहेत.आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी आपण वाचा फोडणार.मी स्वस्थ बसणार राजकारणी नाही.लवकरच अनेक रहस्यांचा खुलासा होईल,असा सूचक इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे हीच ती वेळ म्हणत एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजप नेत्यांच्या अडचणी वाढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमहाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातयं : संजय राऊत
Next articleशरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण