शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत दिली होती.परंतु शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः निवडणूक आयोगाने दिले आहे. बुधवारी आयोगाने निवेदन प्रसिद्ध करत आपण या संदर्भात कोणतेही निर्देश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला शरद पवारांना नोटीस जारी करण्यासंदर्भात कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर आपल्याला आयकर विभागाची नोटीस धाडली असल्याचा उल्लेख काल पत्रकार परिषदेत पवार यांनी केला होता.शरद पवारांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती.त्यावेळी पत्रकारांनी नोटीसीबाबत प्रश्न विचारला असता,आपल्याला सोमवारीच नोटीस प्राप्त झाली,असे शरद पवार म्हणाले होते.२००९, २०१४,२०१९ निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रांवरील माहितीवरून आयकर विभागाने आपल्याला नोटीस बजावली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनाही नोटिस बजावल्याचे समजत आहे. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला, असे म्हणत शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला हाणला. निवडणूक आयोगाच्या सुचनेवरून ही नोटिस बजावण्यात आली आहे. नोटिसीला उत्तर देण्यास विलंब झाला तर दिवसाला १० हजार रुपये दंड आहे. त्यामुळे आपण लवकरच यावर उत्तर देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.

Previous articleनाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राजकीय चर्चांना उधाण
Next articleही देखील अफवाच! खडसेंच्या राष्ट्र्वादीतील प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य