मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कायम असल्याने राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणूका पुन्हा तीन महिने लांबणीवर ढकलण्यात आल्या आहे.सहकार विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहे.त्यानुसार येत्या ३१ डिसेंबर पर्यंत या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव देशात तसेच,महाराष्ट्रातही संक्रमित होत असल्याने,विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.त्यानुसार पहिल्यांदा १८ मार्च रोजी तर दुस-यांदा १७ जून या निवडणूका पुढे ढकलण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले होते.गेल्या सहा महिन्यात राज्यातील कोरोनाचा संसर्ग अटोक्याच न आल्याने राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मात्र राज्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी,राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही.या निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोनातून उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे,अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.