मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या ५ ऑक्टोंबर पासून राज्यातील हॉटेल्स,रेस्टॉरंट आणि बार आता सुरु करण्यात येणार आहेत.मात्र हे सुरू करताना मालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरू होत असले तरी राज्य सरकारने आज जारी केलेल्या नियमावली नुसार कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स,रेस्टॉरंट आणि बार आता सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्ससाठी नियमावली जाहीर केली आहे.त्यानुसार प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ग्राहकांना आणि कर्मचा-यांना तापमान,सर्दी, खोकला आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. कोणत्याही ग्राहकाला रेस्टॉरंट आणि बार मध्ये मास्कशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.केवळ लक्षणविरहीत ग्राहकांनाच रेस्टॉरंट आणि बार मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
काय आहे नियमावली?
- हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोरोनाची चाचणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.
- एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.
- प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग तपासणी करण्यात येणार. तापमान, सर्दी, खोकला आदी
- कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का ? हे तपासणार
- हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी लागणार
- कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार
- ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी लागणार आहे.
- प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात येणार आहे.
- शक्यतो बिलाची रक्कम डिजीटल पद्धतीने स्वीकारावी लागणार आहे.
- वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासणी करणे बंधनकारक
- ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा लागणार
- सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक
- मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचे प्री- बुकिंग करणे आवश्यक
- दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे
- वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.
एसओपीमध्ये पुढील प्रमाणे सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत
कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे, खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा.एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा. टेबलांच्यामध्ये किमान १ मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा. ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे. मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री – प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तु, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत. ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजुला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डस, डार्टस्, व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल. इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमला मनाई असेल. सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. एन ९५ किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे. ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता,सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. याशिवाय ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये येण्यापुर्वी आणि आल्यानंतर घ्यावयाच्या दक्षता, अन्न आणि पेयपदार्थ तयार करणे आणि त्याची सेवा देताना घ्यावयाच्या दक्षता, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, ग्राहकांना सेवा देताना घ्यावयाची दक्षता, बारमध्ये घ्यावयाच्या दक्षता, किचनमध्ये घ्यावयाच्या दक्षता, सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्टाफ एरियासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची वाहतूक, कर्मचाऱ्यांच्या गणवेशासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा, एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये कोरोना लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबाधीत आढळल्यास तातडीने करावयाची कार्यवाही अशा विविध मुद्द्यांसंदर्भातील मार्गदर्शक सुचनांचा समावेश एसओपीमध्ये करण्यात आला आहे.